Tuesday, 30 April 2019

कधी वाटतं आयुष्य हे एक समीकरण असावं...
कारण अधिक-उणे,कमी-जास्त हे हिशेब इथे चालतात !
कधी वाटतं आयुष्य हे एक गाणं असावं...
कारण इथेही वादी, संवादी, विवादी,वर्ज्य वगैरे 'राग' लोभ असतात
कधी वाटतं आयुष्य हे एक पुस्तक असावं...
कारण इथे पानांप्रमाणे माणसेही उलटतात, उलगडतात !
कधी वाटतं आयुष्य हे एक व्यंजन असावं...
कारण इथं सर्वकाही प्रमाणातच असावं लागतं
मीठ चिमुटभर, साखर दोन चमचे,
वेलदोडा चवीनुसार, केशर आवश्यकतेनुसार !
कधी वाटतं आयुष्य हे वस्त्रासारखं असावं...
कारण इथेही असते नात्यांची गुंतागुंत, घट्ट वीण
अन प्रसंगी उसवणूकसुद्धा !
कधी तरी मध्यरात्री अर्धवट जागेपणीच वाटत
एक अख्खा दिवस जीवनावर प्रेम करावं
रंग उडालेल्या गोजिर्या रूपावर याच्या
द्या व्या काही रंगीत छटा नावीन्याच्या
मनमोकळ्या आभाळाखाली दूर लपत छपत
बसून राहावं हसत एकमेकांशी गप्पा मारत
जगाच्या ताळमेळीचीही पर्वा न करता निवांत
जगून घ्यावं आपल्याच तंद्रीत सूर्य अस्ताला जाईपर्यंत
पण अखेर वाजला परखड सत्याचा गजर
विसरू नको कर्तव्यांना , तुझ्या भावनांना आवर
माणूस आहेस तू नाही मोडू शकत चाकोरी
आलास या जन्मा इथे बंधने तोडण्याची चोरी
समाजासाठीच जगतो आपण आपला जन्म उभा
इथे नाही कोणाला स्वप्नं बघायची हि मुभा
अगदीच असह्य झालं तर शांत डोळे मिटुन नीज
पण जगत असताना नाही बोलू शकत "टाईम प्लीज "
सुकलं पान
किती दुर्मिळ हा आनंद,जो महागतो स्वतःला सहज देण्याकरिता,
जणू आयुष्यात येतो फक्त स्वतःचाच पाहुणचार घेण्याकरिता;
जो लाच घेतो संपूर्ण जीवनाची,अख्खं आयुष्य खेचून,
असेल मर्जी तरच देतो,स्वतःचे काहीच क्षण वेचून;
देतो तर असा कि,शेवाळतो सारं जीवन जणू हिरवं कंच रान,
नाही तर सोशून घेतो जीवाला,बनवून हलकं सुकलं पान;
ज्याने एका हवेच्या झुळ्केनेच सहज जीवन शाखे वरून तरंगत पडावं,
व चालत्या माणसाच्या चाहुलीनेच पाचोळ्यागत हवेत उडावं;
जणू काही जीवन मूल्यच नाही,कि कोणी वेचून अर्पावं,
साठवून उरल्या भावनांना,कि कोणीतरी पुस्तकी तरी जपून ठेवावं;
खोट्या आशेने कि,कधीतरी कोणी उघडून बघेल याची कस उतरलेली जाळी,
आणि त्यातूनच वाचेल पुन्हा,फसव्या जीवनाच्या पुढल्या चार ओळी....!!!!
मुसळधार पावसामुळे
चांदण्या हळूच ढगांआड़ गेल्यात
क्षणिक वाटू लागले
की या काळोख्यात
त्या पावसाच्या थेंबांच्या
रुपात जमिनीवर पडू लागले
विजेच्या लख्ख असा
प्रकाश जणू त्या थेंबांची
शोभा वाढवू लागली
नि ढगआपला  गदगडाट आवाज करून
जणू वाटे आपल्या हातांनी  टाळ्या
वाजवून त्यांचे स्वागत करू पाहतेय
सोबतच माती स्वःताचा सुगंध
अख्ख्या  निसर्गाचा कायापलट करते
कधी सुखाच्या सागरात, तर कधी दु:खाच्या वाळवंटात
कधी यशाच्या शिखरावर, तर कधी अपयशाच्या दरीत
आयुष्य एका झोक्यासारखे झुलत राहते

आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ
चांगले पत्ते मिळतील की नाही, हे सांगता येत नाही
पण मिळालेल्या पत्त्यांवर आपण कसा डाव मांडतो
या वर सगळं अवलंबून असतं

जगात येताना आपल्याकडे देह असतो नाव नाही
जग सोडताना मात्र नाव असतं देह नाही
मिळालेल्या देहाचे नावात रुपांतर करण्याचा,
हा प्रवास म्हणजे आयुष्य

नियतीचे गणित कधी मांडता येत नसते
आयुष्यात कधी काय होईल, काही सांगता येत नसते
आयुष्यात तसे नसते काही बेतलेले
आयुष्य एक उत्तर प्रश्न ठाऊक नसलेले
माझ्या मायेचा पदर उन्हातली ती सावली
थंड वाऱ्याची झुळूक अशी भाषा हि मराठी
कधी बाबांचा तडाखा कधी आईची अंगाई
बहिणभावांची भांडणे अशी भाषा ही मराठी
ज्ञान देई अगणित अलंकारात सजूनी
शब्द मोत्याचे हे मणी अशी भाषा ही मराठी
आदर देई प्रत्येकाला नीतिमत्ता तिच्यामध्ये
भावनांची ती ताकद अशी भाषा ही मराठी
हसवून देई कधी कधी देई डोळा पाणी
मांडे सारीपाट जीवनाचा अशी भाषा ही मराठी
जन्म हा एका टिंबासारखा असतो
गणितात जसा सगळ्याची सुरूवात करतो
तसाच आयुष्यातही करतो
नाती म्हणजे छेदण्या रेशा
तुमच्या भोवती जाळं बुनून राहतात
जपुन हाताळावी लागतात नाही तर,
एका सोबत अनेक तुटतात
प्रेम एका त्रिकोणासारखे असते
बांधिलकी, जवळीक आणि विश्वास
या वर टिकलेले असते
एकही बाजू कमी पडली की नाहिसे होते
मैत्री वर्तुळासारखी असते
जी कुणाशीही, कधीही आणि कशीही सुरू होते
आणि सुरू होऊन फक्त चालतच राहते
तिला अंत नसतो
आयुष्य एका ओळीसारखे असते
जन्माच्या टिंबापासून सुरू होते आणि
नाती, मैत्री आणि प्रेमा भोवती फिरत
कळत नकळत आपल्या अंतापर्यंत घेऊन जाते
असेच असते हे आयुष्याचे गणित जे
प्रत्येकाचे जीवन निर्धारीत करत असते