Tuesday, 30 April 2019

मी ही कधी कधी
उनाड वारा होऊ पाहतो
क्षितिजा पल्याडच्या स्वप्नांना
मी आपलंसं करू पाहतो

त्या चमकणाऱ्या चांदण्यांत
मी आपलंसं कोणी तरी शोधत असतो
उन्मळणार्या पाना परी मी
ही जमिनीवर अलगद पडू पाहतो

दवबिंदू परी गवंतांच्या पातींवर
जरासा विसावा घेऊ पाहतो
पापण्यांच्या त्या कडा
भिजवणारा तो थेंब होऊ पाहतो

त्या किर्रर्र रातीचा प्रकाश
देणारा काजवा होऊ पाहतो
आधार पाहणाऱ्या त्या लतांचा
मी आधार होऊ पाहतो

मी ही कधी कधी
उनाड वारा होऊ पाहतो
इंद्रधनू परी आकाशात
रंग प्रीतीचे उधळू पाहतो
मनाचिया आत जाणिवेची ज्योत
पाहते सतत जगण्यास
पाहणे पाहते वेगळी उरते
क्वचित दिसते क्षणभर
तिचे ते अस्तित्व कधी मज कळे
अंतर उजळे  क्षणभरी
पुन्हा जगण्याचा उधळतो वारा
कैफाचा धुरळा कोंदाटतो
पुन्हा डोळ्यामध्ये जमा होते पाणी
मिटते पापणी आपोआप
घडावे जगणे कळावे जगणे  
अस्तित्व फुटणे गूढ गम्य

कधी बोलके तर कधी अबोल
कधी विदुषकासारखे हसविणारे
तर कधी कोपर्यात बसून मुसमुस करून रडविणारे
कधी कुणाच्या आठवणीत वाळवंटातील निवडुंगासारखे एकटे पाडणारे
तर कधी समस्यांच्या विळख्यात भोवर्यासारखे गोलगोल फिरवणारे
प्रत्येक मिनिट्यांमध्ये रंग बदलविणारे
आणि त्याच सेकंदात आम्हाला फसविणारे
कधी मायेसारखे कुरवाळून जवळ करणारे
तर कधी दुसरे समजून दूर लोटणारे
असेच हे सतत पळणारे क्षण
कधीच आपले नसणारे
पण आपले असल्याची जाणीव करून देणारे.
अरे क्षणा, काश!! आम्ही पण तुझ्यासारखे
डावपेच खेळण्यात माहिर असते
तर तुलाच तूझ्या खेळात हरवून
आपल्या इच्छेनुसार चालविले असते
आणि आवडीच्या क्षणांना मनाच्या डायरीत लपवून ठेवले असते
पण तू तर वार्यासारख्या आहेस न
तू कुठे आमच्यासारख्या कासवांसाठी थांबशील??
फक्त तू जगण्यासाठी एक
नवीन उमेद देऊन जाशील..
आपल्या आयुष्यात जागोजागी पूर्णविराम आहेत
प्रसंग प्रसंगाला ते द्यावे लागत आहे ---दिले गेले आहेत
प्रसंगाप्रमाणेच पूर्णविराम
भावनांना, विचारांना, घटनांना
सुखाला,दुःखाला तसेच वेदनांना दिले  आहेत
जीवनांतील प्रश्न चिन्हां पुढेही
पूर्णविरामच आहेत
कारण त्यामागील प्रश्नांची उत्तरे
अजूनही अर्धवट लोंबकळत आहेत
टिंब-टिंब-टिंब मिळून रेघ बनते
जीवन म्हणूनच फक्त लकीर वाटते
अर्थहीन -दिशाहीन
फक्त पुढे सरकणारी
काळाच्या ओघाबरोबर                                        
फक्त क्षितिजापर्यंत  जाणारी
ह्याच रेघेत भावना अन  प्रसंग
गुंफले गेले आहेत   
आणखीही अनेक येणार आहेत
तसेच पूर्णविराम रहाणार आहेत दिले जाणार आहेत

आयुष्य आहे खूपच मोठे जगण्यासाठी ,
पण मी म्हणते आहे लहान हे आयुष्य,
ह्या क्षणात जगत आहे,
    पुढच्या क्षणात आहे  कि नाही कोण जाणे
हातांच्या ओंजळीत धरलेले पाणी ,
 थेंब - थेंब निसटुनी जाते ,
पावसातल्या धारांना  पकडता येत नाही ,
           जोरात सुटलेल्या हवेताला एक  धुळीचा कण ,
का हातानी  धरता येत नाही ?
           आयुष्यातला एकहि  क्षण कोणासाठी थांबत नाही,
म्हणून म्हणते  प्रत्येक क्षण जगा जीवनातला
आपल्या लोकांसोबत ,
आपल्या मित्र - मैत्रिणी सोबत ,
वेळच उरणार नाही ,
काल गेला नि आज आहे  उद्याचे काय माहित नाही,
            राहिले कुठे आयुष्य...........
म्हणूनच म्हणते आयुष्य हे लहान आहे
जगण्यासाठी ,
कोणालातरी आपली  आठवण येण्यासाठी ,
              कोणाचीतरी आठवण काढण्यासाठी ,
आपल्या लोकांसोबत राहण्यासाठी
खरे आहे ना हे ?
म्हणूनच आयुष्य हे लहान आहे जगण्यासाठी

काय लिहावे आज, 'कारण' काही सुचेना मला
उसंत आहे, शब्द आहेत, 'आठवण' कोणाचीच आज येईना मला..
खोडकर आहे वातावरण, पण चिमटा काही बसेना मला
ध्यान लावून बसलोय खरं, पण वेध काही लागेना मला..
मोगरा फुलला, चाफा बहरला, सुगंध काही येईना मला
खूप काही सांगायचय, खूप काही बोलायचय,
पण माझं म्हणावं असं, ऐकणारं कोणी नाहीये मला..
पाउसही आतुर झालाय, चिंब चिंब करण्यास मला
पक्ष्यांची किलबिल प्रवृत्त करतीये, सूर काही नवे गाण्यास मला..
कठोर झालंय मन, कोमेजून गेलंय तन,
तरी भावना काही आवरेना मला
शांत झालोय, स्तब्ध झालोय,
माझा मीच काही केल्या सापडेना मला..
काय लिहावे आज, 'कारण' काही सुचेना मला
उसंत आहे, शब्द आहेत, 'आठवण' कोणाचीच आज येईना मला..

कधी वाटतं आयुष्य हे एक समीकरण असावं...
कारण अधिक-उणे,कमी-जास्त हे हिशेब इथे चालतात !
कधी वाटतं आयुष्य हे एक गाणं असावं...
कारण इथेही वादी, संवादी, विवादी,वर्ज्य वगैरे 'राग' लोभ असतात
कधी वाटतं आयुष्य हे एक पुस्तक असावं...
कारण इथे पानांप्रमाणे माणसेही उलटतात, उलगडतात !
कधी वाटतं आयुष्य हे एक व्यंजन असावं...
कारण इथं सर्वकाही प्रमाणातच असावं लागतं
मीठ चिमुटभर, साखर दोन चमचे,
वेलदोडा चवीनुसार, केशर आवश्यकतेनुसार !
कधी वाटतं आयुष्य हे वस्त्रासारखं असावं...
कारण इथेही असते नात्यांची गुंतागुंत, घट्ट वीण
अन प्रसंगी उसवणूकसुद्धा !