Tuesday 31 May 2011

साधं सोपं आयुष्य.....

साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं

 जसं बोलतो तसं नेहमी
वागायला थोडंच हवं
प्रत्येक वागण्याचं कारण
सांगायला थोडंच हवं
ज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं
ज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं!

मनात जे जे येतं ते ते
करून बघितलं पाहिजे आपण
जसं जगावं वाटतं तसंच
जगून बघितलं पाहिजे आपण
करावंसं वाटेल ते करायचं
जगावंसं वाटेल तसं जगायचं...
 
 

आपला दिवस होतो 
जेंव्हा जाग आपल्याला येते
आपली रात्र होते जेंव्हा
झोप आपल्याला येते
झोप आली की झोपायचं
जाग आली की उठायचं!

पिठलं भाकरी मजेत खायची
जशी पक्वान्नं पानात
आपल्या घरात असं वावरायचं
जसा सिंह रानात!
आपल्या जेवणाचं, आपल्या जगण्याचं
आपणच कौतुक करायचं

असेलही चंद्र मोठा
त्याचं कौतुक कशाला एवढं
जगात दुसरं चांदणं नाही
आपल्या हसण्या एवढं!
आपणच आपलं चांदणं बनून
घरभर शिंपत रहायचं

साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं 

वहीचं पान ..

वहीच्या पानांत लिहिलय माझ मन...
काही पाने भरलित...तर काही तशीच कोरी अजून ...
भरलेली तरी कुठे सांगतायत खरी गोष्ट ठासून..
बरीचशी पुसट...तर काहीच आहेत ठळक अजून...

स्वप्नं  पाहिलीत बरीचशी लिहून...काही उतरली सत्यात...काही अजूनही अर्धसत्यात..तर बरीचशी दिलीत फाडून...फाटलेली पान जरी ती ...तरी पीच्छा कुठे देतात सुटून...
लक्षात ठेवा..फाटलेल्या पानांचा उभा कोपरा कायम असतो तिथेच चिटकून...



अनुभवलंय बराच काही लिहिता लिहिता...
अर्ध मदमस्त आनंदयात्रीसारखा...तर उरलेलं उनाड पक्ष्यासारख...आता जरा थोडा काही फक्त स्वतासाठी लिहायचंय..आयुष्यात परत एकदा प्रेमाच्या अडीच अक्षरांना गिरवायचय.. !!


नवीन कोऱ्या पानांचा वास आता उत्साहित करतोय..
आधी लिहिलेल्या पानांना खुलं आव्हान देतोय...आता जपूनच लिहायचं जरा..नको ती खाडाखोड पुन्हा...म्हणतात ना..सुंदर नि सुवाच्य अक्षर हाच खरा दागिना..!!!

Tuesday 17 May 2011

आयुष्य


आयुष्य म्हणजे झाड...रंगीबेरंगी पाना-फुलांचं...
काट्यांची बोचरी धार आहे सर्वांनाच..
तरी कोणाचं वाळवंटी निवडुंगाच...तर कोणाचं फुललेल्या गुलाबाचं.
आयुष्य म्हणजे झाड...
बीजातून अंकुर फुटताक्षणी..
फक्त आणि फक्त उंचच उंच व्हायला धडपडणार..
तारुण्याच्या वसंतात...हिरवीगार पालवी फुटणार...
अन...दुःखाच्या पानगळीत..एक-एक पान ढाळणार...
आयुष्य म्हणजे झाड...
कुणाचं वितभर...तर कुणाचं ढगभर...
पण त्याच्या "केवढं" असण्याला किंमत असते टिचभर...
सदाफुलीवर कायम फुलांचा डोंगर..
पण त्याला नाही रातराणीची सर..
आयुष्य म्हणजे झाड...
उन्हा-पावसात घट्ट पाय रोवून उभं राहणारं...
आपल्या कुशीत अगणित जीवांना आसरा देणारं..
कधी वेल होऊन वादळाच्या दिशेने नमतं घेणार...
अन वेळ आल्यास वडासारखं निधड्या छातीने संकटाला सामोरं जाणार...
आयुष्य म्हणजे झाड...
कुणाचं अशोकासारखा सरळमार्गी वर चढणार...
तर कुणाचं वेड्या बाभळीसारख गुंता करून बसणारं..
कुणी कसं जगावं..हे ज्याचे त्याने ठरवावं..
सांगायचा मुद्दा हाच कि...झटपट फळं देणारं झाड कडू लिम्बाच..
अन उशिरा का होईना...किती का कष्ट घ्यायला लागेना..
शेवटी मधुर फळं धरणार झाड आंब्याच...!