Tuesday 30 April 2019

मी ही कधी कधी
उनाड वारा होऊ पाहतो
क्षितिजा पल्याडच्या स्वप्नांना
मी आपलंसं करू पाहतो

त्या चमकणाऱ्या चांदण्यांत
मी आपलंसं कोणी तरी शोधत असतो
उन्मळणार्या पाना परी मी
ही जमिनीवर अलगद पडू पाहतो

दवबिंदू परी गवंतांच्या पातींवर
जरासा विसावा घेऊ पाहतो
पापण्यांच्या त्या कडा
भिजवणारा तो थेंब होऊ पाहतो

त्या किर्रर्र रातीचा प्रकाश
देणारा काजवा होऊ पाहतो
आधार पाहणाऱ्या त्या लतांचा
मी आधार होऊ पाहतो

मी ही कधी कधी
उनाड वारा होऊ पाहतो
इंद्रधनू परी आकाशात
रंग प्रीतीचे उधळू पाहतो
मनाचिया आत जाणिवेची ज्योत
पाहते सतत जगण्यास
पाहणे पाहते वेगळी उरते
क्वचित दिसते क्षणभर
तिचे ते अस्तित्व कधी मज कळे
अंतर उजळे  क्षणभरी
पुन्हा जगण्याचा उधळतो वारा
कैफाचा धुरळा कोंदाटतो
पुन्हा डोळ्यामध्ये जमा होते पाणी
मिटते पापणी आपोआप
घडावे जगणे कळावे जगणे  
अस्तित्व फुटणे गूढ गम्य

कधी बोलके तर कधी अबोल
कधी विदुषकासारखे हसविणारे
तर कधी कोपर्यात बसून मुसमुस करून रडविणारे
कधी कुणाच्या आठवणीत वाळवंटातील निवडुंगासारखे एकटे पाडणारे
तर कधी समस्यांच्या विळख्यात भोवर्यासारखे गोलगोल फिरवणारे
प्रत्येक मिनिट्यांमध्ये रंग बदलविणारे
आणि त्याच सेकंदात आम्हाला फसविणारे
कधी मायेसारखे कुरवाळून जवळ करणारे
तर कधी दुसरे समजून दूर लोटणारे
असेच हे सतत पळणारे क्षण
कधीच आपले नसणारे
पण आपले असल्याची जाणीव करून देणारे.
अरे क्षणा, काश!! आम्ही पण तुझ्यासारखे
डावपेच खेळण्यात माहिर असते
तर तुलाच तूझ्या खेळात हरवून
आपल्या इच्छेनुसार चालविले असते
आणि आवडीच्या क्षणांना मनाच्या डायरीत लपवून ठेवले असते
पण तू तर वार्यासारख्या आहेस न
तू कुठे आमच्यासारख्या कासवांसाठी थांबशील??
फक्त तू जगण्यासाठी एक
नवीन उमेद देऊन जाशील..
आपल्या आयुष्यात जागोजागी पूर्णविराम आहेत
प्रसंग प्रसंगाला ते द्यावे लागत आहे ---दिले गेले आहेत
प्रसंगाप्रमाणेच पूर्णविराम
भावनांना, विचारांना, घटनांना
सुखाला,दुःखाला तसेच वेदनांना दिले  आहेत
जीवनांतील प्रश्न चिन्हां पुढेही
पूर्णविरामच आहेत
कारण त्यामागील प्रश्नांची उत्तरे
अजूनही अर्धवट लोंबकळत आहेत
टिंब-टिंब-टिंब मिळून रेघ बनते
जीवन म्हणूनच फक्त लकीर वाटते
अर्थहीन -दिशाहीन
फक्त पुढे सरकणारी
काळाच्या ओघाबरोबर                                        
फक्त क्षितिजापर्यंत  जाणारी
ह्याच रेघेत भावना अन  प्रसंग
गुंफले गेले आहेत   
आणखीही अनेक येणार आहेत
तसेच पूर्णविराम रहाणार आहेत दिले जाणार आहेत

आयुष्य आहे खूपच मोठे जगण्यासाठी ,
पण मी म्हणते आहे लहान हे आयुष्य,
ह्या क्षणात जगत आहे,
    पुढच्या क्षणात आहे  कि नाही कोण जाणे
हातांच्या ओंजळीत धरलेले पाणी ,
 थेंब - थेंब निसटुनी जाते ,
पावसातल्या धारांना  पकडता येत नाही ,
           जोरात सुटलेल्या हवेताला एक  धुळीचा कण ,
का हातानी  धरता येत नाही ?
           आयुष्यातला एकहि  क्षण कोणासाठी थांबत नाही,
म्हणून म्हणते  प्रत्येक क्षण जगा जीवनातला
आपल्या लोकांसोबत ,
आपल्या मित्र - मैत्रिणी सोबत ,
वेळच उरणार नाही ,
काल गेला नि आज आहे  उद्याचे काय माहित नाही,
            राहिले कुठे आयुष्य...........
म्हणूनच म्हणते आयुष्य हे लहान आहे
जगण्यासाठी ,
कोणालातरी आपली  आठवण येण्यासाठी ,
              कोणाचीतरी आठवण काढण्यासाठी ,
आपल्या लोकांसोबत राहण्यासाठी
खरे आहे ना हे ?
म्हणूनच आयुष्य हे लहान आहे जगण्यासाठी

काय लिहावे आज, 'कारण' काही सुचेना मला
उसंत आहे, शब्द आहेत, 'आठवण' कोणाचीच आज येईना मला..
खोडकर आहे वातावरण, पण चिमटा काही बसेना मला
ध्यान लावून बसलोय खरं, पण वेध काही लागेना मला..
मोगरा फुलला, चाफा बहरला, सुगंध काही येईना मला
खूप काही सांगायचय, खूप काही बोलायचय,
पण माझं म्हणावं असं, ऐकणारं कोणी नाहीये मला..
पाउसही आतुर झालाय, चिंब चिंब करण्यास मला
पक्ष्यांची किलबिल प्रवृत्त करतीये, सूर काही नवे गाण्यास मला..
कठोर झालंय मन, कोमेजून गेलंय तन,
तरी भावना काही आवरेना मला
शांत झालोय, स्तब्ध झालोय,
माझा मीच काही केल्या सापडेना मला..
काय लिहावे आज, 'कारण' काही सुचेना मला
उसंत आहे, शब्द आहेत, 'आठवण' कोणाचीच आज येईना मला..

कधी वाटतं आयुष्य हे एक समीकरण असावं...
कारण अधिक-उणे,कमी-जास्त हे हिशेब इथे चालतात !
कधी वाटतं आयुष्य हे एक गाणं असावं...
कारण इथेही वादी, संवादी, विवादी,वर्ज्य वगैरे 'राग' लोभ असतात
कधी वाटतं आयुष्य हे एक पुस्तक असावं...
कारण इथे पानांप्रमाणे माणसेही उलटतात, उलगडतात !
कधी वाटतं आयुष्य हे एक व्यंजन असावं...
कारण इथं सर्वकाही प्रमाणातच असावं लागतं
मीठ चिमुटभर, साखर दोन चमचे,
वेलदोडा चवीनुसार, केशर आवश्यकतेनुसार !
कधी वाटतं आयुष्य हे वस्त्रासारखं असावं...
कारण इथेही असते नात्यांची गुंतागुंत, घट्ट वीण
अन प्रसंगी उसवणूकसुद्धा !
कधी तरी मध्यरात्री अर्धवट जागेपणीच वाटत
एक अख्खा दिवस जीवनावर प्रेम करावं
रंग उडालेल्या गोजिर्या रूपावर याच्या
द्या व्या काही रंगीत छटा नावीन्याच्या
मनमोकळ्या आभाळाखाली दूर लपत छपत
बसून राहावं हसत एकमेकांशी गप्पा मारत
जगाच्या ताळमेळीचीही पर्वा न करता निवांत
जगून घ्यावं आपल्याच तंद्रीत सूर्य अस्ताला जाईपर्यंत
पण अखेर वाजला परखड सत्याचा गजर
विसरू नको कर्तव्यांना , तुझ्या भावनांना आवर
माणूस आहेस तू नाही मोडू शकत चाकोरी
आलास या जन्मा इथे बंधने तोडण्याची चोरी
समाजासाठीच जगतो आपण आपला जन्म उभा
इथे नाही कोणाला स्वप्नं बघायची हि मुभा
अगदीच असह्य झालं तर शांत डोळे मिटुन नीज
पण जगत असताना नाही बोलू शकत "टाईम प्लीज "
सुकलं पान
किती दुर्मिळ हा आनंद,जो महागतो स्वतःला सहज देण्याकरिता,
जणू आयुष्यात येतो फक्त स्वतःचाच पाहुणचार घेण्याकरिता;
जो लाच घेतो संपूर्ण जीवनाची,अख्खं आयुष्य खेचून,
असेल मर्जी तरच देतो,स्वतःचे काहीच क्षण वेचून;
देतो तर असा कि,शेवाळतो सारं जीवन जणू हिरवं कंच रान,
नाही तर सोशून घेतो जीवाला,बनवून हलकं सुकलं पान;
ज्याने एका हवेच्या झुळ्केनेच सहज जीवन शाखे वरून तरंगत पडावं,
व चालत्या माणसाच्या चाहुलीनेच पाचोळ्यागत हवेत उडावं;
जणू काही जीवन मूल्यच नाही,कि कोणी वेचून अर्पावं,
साठवून उरल्या भावनांना,कि कोणीतरी पुस्तकी तरी जपून ठेवावं;
खोट्या आशेने कि,कधीतरी कोणी उघडून बघेल याची कस उतरलेली जाळी,
आणि त्यातूनच वाचेल पुन्हा,फसव्या जीवनाच्या पुढल्या चार ओळी....!!!!
मुसळधार पावसामुळे
चांदण्या हळूच ढगांआड़ गेल्यात
क्षणिक वाटू लागले
की या काळोख्यात
त्या पावसाच्या थेंबांच्या
रुपात जमिनीवर पडू लागले
विजेच्या लख्ख असा
प्रकाश जणू त्या थेंबांची
शोभा वाढवू लागली
नि ढगआपला  गदगडाट आवाज करून
जणू वाटे आपल्या हातांनी  टाळ्या
वाजवून त्यांचे स्वागत करू पाहतेय
सोबतच माती स्वःताचा सुगंध
अख्ख्या  निसर्गाचा कायापलट करते
कधी सुखाच्या सागरात, तर कधी दु:खाच्या वाळवंटात
कधी यशाच्या शिखरावर, तर कधी अपयशाच्या दरीत
आयुष्य एका झोक्यासारखे झुलत राहते

आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ
चांगले पत्ते मिळतील की नाही, हे सांगता येत नाही
पण मिळालेल्या पत्त्यांवर आपण कसा डाव मांडतो
या वर सगळं अवलंबून असतं

जगात येताना आपल्याकडे देह असतो नाव नाही
जग सोडताना मात्र नाव असतं देह नाही
मिळालेल्या देहाचे नावात रुपांतर करण्याचा,
हा प्रवास म्हणजे आयुष्य

नियतीचे गणित कधी मांडता येत नसते
आयुष्यात कधी काय होईल, काही सांगता येत नसते
आयुष्यात तसे नसते काही बेतलेले
आयुष्य एक उत्तर प्रश्न ठाऊक नसलेले
माझ्या मायेचा पदर उन्हातली ती सावली
थंड वाऱ्याची झुळूक अशी भाषा हि मराठी
कधी बाबांचा तडाखा कधी आईची अंगाई
बहिणभावांची भांडणे अशी भाषा ही मराठी
ज्ञान देई अगणित अलंकारात सजूनी
शब्द मोत्याचे हे मणी अशी भाषा ही मराठी
आदर देई प्रत्येकाला नीतिमत्ता तिच्यामध्ये
भावनांची ती ताकद अशी भाषा ही मराठी
हसवून देई कधी कधी देई डोळा पाणी
मांडे सारीपाट जीवनाचा अशी भाषा ही मराठी
जन्म हा एका टिंबासारखा असतो
गणितात जसा सगळ्याची सुरूवात करतो
तसाच आयुष्यातही करतो
नाती म्हणजे छेदण्या रेशा
तुमच्या भोवती जाळं बुनून राहतात
जपुन हाताळावी लागतात नाही तर,
एका सोबत अनेक तुटतात
प्रेम एका त्रिकोणासारखे असते
बांधिलकी, जवळीक आणि विश्वास
या वर टिकलेले असते
एकही बाजू कमी पडली की नाहिसे होते
मैत्री वर्तुळासारखी असते
जी कुणाशीही, कधीही आणि कशीही सुरू होते
आणि सुरू होऊन फक्त चालतच राहते
तिला अंत नसतो
आयुष्य एका ओळीसारखे असते
जन्माच्या टिंबापासून सुरू होते आणि
नाती, मैत्री आणि प्रेमा भोवती फिरत
कळत नकळत आपल्या अंतापर्यंत घेऊन जाते
असेच असते हे आयुष्याचे गणित जे
प्रत्येकाचे जीवन निर्धारीत करत असते

नाते शब्दांशी
दुःख ऐकायला नसते कोणी
तेव्हा वाढतो मनावरचा भार
कागदांवर उतरता शब्द हळूच
तेव्हा होते मन हलके फार
मी फारच नशीबवान आहे
नाते जोडले माझ्याशी शब्दांनी
कितीही असले दुःख जरी
गिळून घेतले अश्रू पापण्यांनी
शब्द खिळवून ठेवतात मला
लागताच कधी चाहूल दुःखाची
शपथ आहे शब्दा तुला
नको सोडू साथ कवितेची
भावना उतरते कवितेच्या रूपात
वाट मिळते नवीन वळणाची
अशा जगात वावरतो जिथे
माणसं आहेत दगड मनाची
भाव+अर्थ
शब्द भाव अर्थ कवितेचा
मध्यांतरी, कधी तळाला,
शब्दांच्याच विरामातल्या
शांततेत तो सामावलेला...
शब्दांच्याच कृतीतल्या
आकृतीचा भास मनाला,
परीस्थिती, वय, वृत्ती
सापेक्ष भावनेत गोवलेला...
अर्थ गुढातल्या उत्कटतेचा
नभ आकृती भासातला,
कृष्णविवरातल्या पोकळीचा
कि कोहंमच्या आर्ततेतला..?
रात्र

दिवस गेला सरून , रात्र आली तशी
एकक्षण सुखासाठी , जीव हा उपाशी
आशा ठरली फोल , काही मनाचे न झाले
स्वप्नांचे ते घोडे , नशिबात हरून गेले
दुःखामध्ये हास्याचं , एकमेव कारण मात्र
गोजिरवाण्या स्वप्नांसाठी , आतुरलेली रात्र
दुःखाच्या अंधारात , सुखाचा दिवा
चांदण्यांच्या सोबतीला , चंद्रही हवा
थकून भागून जीव , घेई मग विसावा
एकक्षण त्यालाही , आराम असावा
सारंकाही बोलकं , तरीही मुकीच सारी पात्र
गोजिरवाण्या स्वप्नांसाठी , आतुरलेली रात्र
सूर्यनारायनही , गेला निघून दूर
पाखरे झोपी गेली , हरवले ते सूर
सारं सुने सुने , अन मोकळे किनारे
शब्दाविन गुणगुणनारे , अबोल ते वारे
स्वप्नासाठी झुरणारं , स्वप्नाचं सत्र
गोजिरवाण्या स्वप्नांसाठी , आतुरलेली रात्र